Belagavi

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

Share

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, कर्ज माफ करावे, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपीऐवजी कर आकारणीतील २००० रुपये थेट खात्यात जमा करावेत, यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने मोठी रॅली काढण्यात आली आणि बेळगावला आगमन झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी तातडीने भरपाई देण्यात यावी. येत्या काही दिवसांत साखर कारखाने ऊस गाळप हंगाम सुरू करतील. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याऐवजी, कर आकारणीतून मिळणारे ₹२००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. तसेच, तलाव भरण्याची योजना आणि गाळ काढण्याची योजना तात्काळ राबवावी, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना बाधक ठरणारे कायदे मागे घ्यावेत आणि सुवर्णसौधमध्ये सचिव स्तरावरील कार्यालये स्थलांतरित करावीत. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचीही मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केली.

यावेळी प्रकाश नाईक, सत्यप्पा मल्लापुरे, चुनप्पा पुजारी, सुभाष शिरगूर, किशन नंदी, रमेश वाळी, बाबूगौडा पाटील, गंगाधर मेटी, कुमार मरडी यांच्यासह इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.

Tags: