Belagavi

‘भाजपला गॅरंटी योजनेची काविळ झाली आहे!’ मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

‘भाजपचे लोक आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर बोलण्यासाठी काँग्रेसचे हायकमांड आहेत का?’ असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

शनिवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी ‘मीच पाच वर्षांसाठीचा मुख्यमंत्री आहे’ असे केलेल्या विधानावर उत्तर देताना ते म्हणाले की, “भाजपच्या लोकांना आमच्या पक्षाची इतकी काळजी का आहे? त्यांनी आपल्या पक्षाचे काम सोडून आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे? ते आमचे हायकमांड आहेत का?” असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

“केंद्र सरकारचा एनडीआरएफचा निधी आम्ही गॅरंटी योजनांसाठी वापरलेला नाही. या गॅरंटी योजनांमुळे भाजपच्या लोकांना जणू काविळीचा आजार झाला आहे. कर्नाटकात गॅरंटी योजना यशस्वी झाल्या आहेत आणि त्यामुळेच भाजपमध्ये खळबळ उडाली आहे,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

बिहार, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हरियाणा यांसारख्या राज्यांनी देखील आमच्या राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांची कॉपी केली आहे. “नरेंद्र मोदी यांनी देखील गॅरंटी योजना यशस्वी होणार नाहीत, असे म्हटले होते. पण आता ते स्वतःच आमच्या योजनांची कॉपी करत आहेत,” असे म्हणत त्यांनी भाजपला फटकारले.

बेळगावातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय मीच मंजूर केले होते, परंतु पुढे सत्तेत आलेल्या भाजपने काहीही केले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनीं स्पष्ट केले..

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांनी माहिती दिली की, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे व्यवस्थापन कोणत्याही खासगी रुग्णालयाला दिलेले नाही. जोपर्यंत आमचे डॉक्टर येथे कामकाज सुरू करत नाहीत, तोपर्यंत खासगी रुग्णालयाचे डॉक्टर सेवा देतील.

यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, रामलिंगा रेड्डी, आमदार आसिफ सेठ, राजू कागे, माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: