Belagavi

काकती येथील आजारी वृद्धाचा तोल जाऊन रस्त्यावरच मृत्यू!

Share

आजाराने त्रस्त असलेल्या एका वृद्धाचा जिल्हा रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतत असताना तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. बेळगावच्या किल्ला तलावाजवळ ही करुण घटना घडली आहे.

शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील किल्ला तलावाच्या किल्ल्यासमोर हा प्रकार घडला, मृताची ओळख काकती गावचे गणपती पाटील (वय ६५) अशी पटली आहे. गणपती पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याने बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. रोजच्याप्रमाणे शुक्रवारीही ते उपचारांसाठी रुग्णालयात आले होते आणि त्यानंतर आपल्या काकती गावी परतत होते. रात्रीच्या वेळी किल्ला तलावाच्या किल्ल्यासमोरील रस्त्यावरून चालत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली पडले. डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे गणपती पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.

शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. या संदर्भात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: