विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी विधान परिषद सदस्य सी.टी. रवी आणि कित्तूरचे माजी आमदार महांतेश दोडगौडर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मतदारसंघातील नेसरगी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर भागातील नेसरगी येथील शेतकऱ्यांच्या शेतांना आर. अशोक, सी.टी. रवी, आणि महांतेश दोडगौडर यांच्यासह भाजप नेत्यांनी भेट दिली. या भागामध्ये सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नेत्यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने त्वरीत पीक नुकसानीची भरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली. याप्रसंगी बोलताना आर. अशोक यांनी थेट काँग्रेस सरकारला लक्ष्य केले. “राज्यात शेतकरी पीक नुकसानीमुळे आत्महत्या करत आहेत, पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या मात्र मजा मारत आहेत,” असे गंभीर विधान त्यांनी केले. राज्य सरकारने प्रत्येक हेक्टरसाठी ₹२५,००० ते ₹५०,००० इतकी भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आर. अशोक यांनी केली.
आर. अशोक यांनी राज्य सरकारवर शेतकरी विरोधी धोरणांचा आरोप केला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, या भागातील शेतजमिनी आणि पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्वरित मदत जाहीर करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर, अशोक यांनी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना हलक्या प्रतीचे बियाणे आणि खते पुरवल्याचा आरोपही केला. या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सिद्दारामय्या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे “मृत सरकार” असे संबोधले आणि ते फक्त सत्ता आणि अधिकाराच्या भांडणात व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली.


Recent Comments