विजयादशमीच्या निमित्ताने कागवाड तालुक्यातील ऊगार बुद्रुक गावात श्री पद्मावती देवीच्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत कृष्णा नदीची पूजा भक्तीभावाने संपन्न झाली. तब्बल तीन तास चाललेला हा नदीपूजन सोहळा बुधवारी यशस्वीरित्या पार पडला.

या निमित्ताने श्री पद्मावती देवीच्या मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. यानंतर मंदिराचे प्रमुख शितलगौडा पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच भाविक एकत्र जमले आणि त्यांनी भव्य मिरवणुकीसह कृष्णा नदीच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी भाविकांनी देवीच्या मूर्तीवर अष्टद्रव्यांचा अभिषेक केला.
गेल्या वर्षांप्रमाणे सर्व वस्तू नदीत अर्पण न करता, यावेळी सोंदा जैन मठाचे भट्टाकलंक स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली पूजेच्या परंपरेत पर्यावरणपूरक बदल करण्यात आला. केवळ पंचामृत अभिषेकासाठी वापरले गेलेले दूध, तूप आणि अष्टद्रव्येच नदीला समर्पित करण्यात आले. नदीतील जलचर प्राण्यांना कोणताही अपाय होऊ नये म्हणून उरलेली साखर, धान्य, श्रीफळ आणि फळे बाजूला काढून प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात आली, अशी माहिती शितलगौडा पाटील यांनी दिली.
ऊगारच्या पद्मावती देवीला सुमारे ४०० वर्षांचा इतिहास आहे. विजयादशमी आणि खंडे नवमीच्या दिवशी नदीची पूजा करण्याची ही पवित्र परंपरा आजही सुरू आहे. या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात विविध गावांमधून आलेले झांजपथक, लोककलापथक, सनई वादन, विविध वाद्यवृंद, दोन अश्व (घोडे) आणि शस्त्रास्त्रांसह देवीच्या पालखीची मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात काढण्यात आली. हजारो श्रावक-श्राविकांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास चालत करून नदीपुजेत सहभाग घेतला. मंदिराचे अर्चक अशोक उपाध्ये यांनी पूजेचे विधी पार पाडले. सेवा समितीचे सदस्य आणि भक्तांच्या सहकार्याने हा नदीपूजेचा कार्यक्रम यशस्वी ठरला.
Recent Comments