रशियाची राजधानी मास्को येथे आठ दिवस चाललेल्या विश्व युवा शिखर परिषदेत विजापूरच्या कुमारी शिफा जमदार यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित विचार मांडून विश्व शांततेची गरज स्पष्ट केली.

विश्व अणु दिन निमित्त आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत शिफा यांनी द्वेष आणि युद्धाचे वातावरण हे विश्व शांततेसाठी धोकादायक असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी शांतता आणि बंधुत्व हाच यावरचा उपाय असून, भारतीय संस्कृती याच शाश्वत मूल्यांचे समर्थन करते, यावर भर दिला. आजच्या जगात शांतता हाच जीवनमंत्र असायला हवा आणि युवकांनी द्वेष भावना मिटवून शांतता स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक पातळीवरील अशा शिखर परिषदेत विजापूरच्या एका युवतीने भारत देशाचे प्रतिनिधित्व केल्याची ही पहिलीच वेळ आहे. या महत्त्वाच्या सभेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यासह १६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शिफाने विविध राष्ट्रांच्या प्रमुखांसमोर विश्व शांती आणि युवकांची भूमिका यावर समर्थपणे मत मांडून देशाच्या संस्कृतीचा प्रचार केला. आपल्या या योगदानाबद्दल आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मिळालेल्या सन्मानाबद्दल शिफा यांनी अभिमान व्यक्त केला आहे.


Recent Comments