बेळगावमधील शाहूनगरमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या सांगता सोहळ्याची भक्तीभावाने आणि उत्साहात समाप्ती झाली. या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव शाहूनगर येथील श्री गणेश मंदिर सभागृहात ज्ञान साधना केंद्र, बेळगाव आणि उपकेंद्र शाहूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्रोत्सवाचा सांगता सोहळा उत्सवी वातावरणात पार पडला. जीवन विद्या मिशनचे संस्थापक, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि विश्वसंत सद्गुरू पूज्य श्री वामनराव पै यांच्या विचारधारेनुसार, दररोज संध्याकाळी प्रवचन, सामूहिक हरिपाठ, विश्वप्रार्थना, संगीत, मानस पूजा आणि महाआरती असे विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात ज्येष्ठ प्रबोधनकार शंकरराव बांदेकर यांनी ‘नवविधा भक्ती’च्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
अंतिम दिवसाच्या समारंभात गुरुपूजा करण्याचा मान मानराजू आणि विजय यादव या दाम्पत्यास देण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर वंदना बेळगुंदकर, माजी उपमहापौर रेश्मा पाटील, समाजसेवक सचिन पाटील, कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत राठोड आणि निवृत्त सेनाधिकारी उपस्थित होते. यावेळी राधा पाटील, शाहूनगर व कंग्राळी उपकेंद्राचे पदाधिकारी, नामधारक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments