Belagavi

मलप्रभा शुगर कारखान्याचे पुनरुज्जीवन निश्चित : मंत्री हेब्बाळकर

Share

राणी शुगर संचालकपदाच्या निवडणुकीत विजय मिळवलेले विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, मलप्रभा साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करून लवकरच गोड बातमी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, मलप्रभा साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देणे हेच आमचे ध्येय आहे. “हा साखर कारखाना या भागाच्या अस्मितेशी जोडलेला आहे. सध्या या कारखान्यावर १२० कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवले जाईल. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या ९ ऑक्टोबर रोजी चन्नराज हट्टीहोळी सर्वानुमते अध्यक्षपदी निवडले जातील,” असे त्यांनी सांगितले.

हुक्केरी ग्रामीण वीज सहकारी संघाच्या निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, “निवडणुकांमध्ये चुरस असतेच. विजयी उमेदवारांनी संयमाने काम करावे, आणि पराभूत उमेदवारांनी आत्मपरीक्षण करावे. विजयात गर्व नसावा आणि पराभवात खचून जाऊ नये” असे आवाहन केले.

आम बाबासाहेब पाटील म्हणाले की, “कित्तूर भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी मलप्रभा साखर कारखान्याची मोलाची भूमिका आहे. या कारखान्याचा कायापालट करण्यासाठी घडवण्यासाठी सर्व जाती-धर्मांतील लोकांना विश्वासात घेऊन काम केले जाईल.”

विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, “साखर उद्योगाचा अनुभव असल्याने, कारखान्याशी जोडलेल्या शेतकरी व कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. राजकीय क्षेत्रात असलो तरी जनतेच्या आदेशाचा गैरवापर न करता, पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभार केला जाईल. कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारण्यात येईल आणि लवकरच गोड बातमी दिली जाईल.”

नंतर, विविध मान्यवर आणि समर्थकांनी निवडणुकीत विजयी झालेल्या चन्नराज हट्टीहोळी यांचा सत्कार केला.

Tags: