बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीत जारकीहोळी यांच्या पॅनेलविरुद्ध विजय मिळवल्यानंतर माजी खासदार रमेश कत्ती यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी नाव न घेता, “कोणीतरी एकाने हात न घालण्याच्या जागी हात घालून स्वतःचा हात भाजून घेतला आहे,” अशा स्पष्ट शब्दांत विरोधी गटावर टीका केली आहे.

माजी खासदार रमेश कत्ती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मतदाररूपी देवाने आपला निर्णय स्पष्ट केला आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नाव न घेता, त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पलटवार केला. “नको त्या जागी हात घालून कोणीतरी एकाने हात भाजून घेतला आहे. आमचा विजय आम्ही आमच्या मतदाररूपी देवाला समर्पित करतो. आत येणाऱ्यांना आम्ही बाहेर काढले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही खास रणनीती नव्हती. फक्त आपले घर सुरक्षित ठेवायचे होते. स्वाभिमान हा श्रेष्ठ आहे, त्याच्यापुढे पैसा, अहंकार आणि गुंडगिरी चालत नाही. आम्ही ‘डम्मी’ आहोत की ‘डॅडी’ आहोत, हे सिद्ध केले आहे.” असे त्यांनी म्हटले.
“प्रजासत्ताकात एकाच घरात सर्व लोक आमदार आणि विधान परिषद सदस्य झाले, तर समाजातील लोकांनी काय करायचे? आम्ही सर्वांना प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जाऊ. सहकारी क्षेत्रात जर आवश्यक ध्रुवीकरण झाले नाही, तर पुढील ५ वर्षे डीसीसी बँकेची निवडणूकच होणार नाही. आम्ही ३२०० कोटी रुपयांचे कर्ज ३ लाख २० हजार लोकांना शून्य व्याजदराने डीसीसी बँकेमार्फत दिले आहे. पतसंस्थांना बळकट करण्यात आले आहे. बँक वाचल्यास सहकारी संस्था वाचतील; पण पैसे देऊन मते विकत घेतल्यास बँक वाचणार नाही. पुढील ५ वर्षांसाठी डीसीसी बँकेची निवडणूक होणार नाही.” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“राजकीय स्तरावर आम्ही अनेकदा त्यांना मदत केली आहे, त्यांनीही आम्हाला मदत केली आहे. मात्र, माझे बंधू उमेश कत्ती यांच्या निधनानंतर त्यांच्यामध्ये बदल झालेला दिसून आला आणि काही अदृश्य हात काम करत असल्याचे दिसले. याच कारणास्तव आम्ही निर्णय घेऊन पुढे आलो आहोत.” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या टीकेला लोकांनीच उत्तर दिले असून, आता हा ‘मॅटर क्लोज’ झाला आहे, असे ते म्हणाले.


Recent Comments