बेळगाव येथील तानाजी गल्ली रेल्वे गेटवर आधीच वाहनांसाठी संचार बंद केला आहे. आज रेल्वे विभागाने पादचारी मार्गही बंद केला. यामुळे स्थानिकांनी रेल्वे मार्ग अडवून जोरदार निदर्शने केली. स्थानिकांची तक्रार ऐकून प्रशासनाला बंद केलेला मार्ग पुन्हा उघडण्यास भाग पाडले.

तानाजी गल्ली रेल्वे गेट परिसरात आधीच वाहनांना बंदी घालण्यात आली आहे मात्र आज पादचारी मार्गही बंद केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केले.
रेल्वे विभागाने आधीच तानाजी गल्ली रेल्वे रुळावर भिंत बांधून वाहनांना याठिकाणी संचारबंदी केली होती. यानंतर येथील व्यावसायिकांवर प्रथमतः मोठा परिणाम दिसून आला. याठिकाणी पादचाऱ्यांसाठी काहीशी जागा ठेवण्यात आली होती. परंतु आज तीदेखील बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिक, प्रामुख्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला. यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलन छेडत रेल्वे विभाग आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
फोर्ट रोड ते महाद्वार रोड भागात ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत होता. शिवाय रस्ता अडविल्याने पादचाऱ्यांनाही नाहक भुर्दंड बसत होता. एकीकडे वाहनचालकांना बंदी आणि दुसरीकडे पादचाऱ्यांची गैरसोय करत प्रशासन आणि रेल्वे विभागाला नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि नागरिकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
महिलांना बाजारपेठेतील किंवा दुकानांतील कामासाठी जाण्यात अडथळा येत आहे. भिंत काढून टाकल्यास चांगले होईल, असे स्थानिकांनी म्हटले. प्रशासन जनतेच्या हिताचा विचार करत नाही, शाळकरी मुलांना मोठा त्रास होतो आहे आणि रिक्षावाल्यांकडून जास्त भाडे वसूल होत असल्याचीही तक्रार येथील नागरिकांनी केली.
या दरम्यान, श्रीरामसेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडूसकर यांनीही स्थानिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आवाहन केले. पोलिस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या. अखेर स्थानिकांच्या दबावाखाली प्रशासनाला बंद केलेला मार्ग पुन्हा उघडावा लागला.
याबाबत पुढील निर्णयासाठी बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले आहे.


Recent Comments