हुक्केरी तालुक्यात कत्ती व ए.बी. पाटील कुटुंबीयांनी आपला राजकीय किल्ला पुन्हा एकदा बळकट केला आहे. देशातील एकमेव प्रतिष्ठित विद्युत् सहकारी संस्था हुक्केरी विद्युत् सहकारी संघ याच्या निवडणुकीत स्वाभिमानी पॅनलने विजय मिळवला.

या संस्थेवर गेल्या ३० वर्षांपासून कत्ती कुटुंबीयांचे वर्चस्व होते. दिवंगत उमेश कत्ती यांच्या निधनानंतर गोकाक व निप्पाणीतील काही नेत्यांनी हुक्केरी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत रमेश कत्ती यांना बेदखल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रथम बेलगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून कत्ती यांना हटवले. त्यानंतर हुक्केरी विद्युत् सहकारी संघ आणि संकेश्वर हिरण्यकेशी साखर कारखान्यावरही नियंत्रण मिळवले.
या पार्श्वभूमीवर राजकारणातून मागे हटलेले रमेश कत्ती यांचे समर्थक, मतदार आणि हितचिंतक पुन्हा एकवटले. त्यांनी राजकीय प्रतिस्पर्धी, माजी मंत्री ए.बी. पाटील यांच्यासोबत युती करून स्वाभिमानी पॅनल उभे केले. या पॅनलने संपूर्ण तालुक्यात दौरे करून मंत्री सतीश जारकिहोळी, आमदार बालचंद्र जारकिहोळी व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या पॅनलचा पराभव केला.
रविवारी मध्यरात्री जाहीर झालेल्या निकालात स्वाभिमानी पॅनलचे सर्व १५ उमेदवार विजयी ठरले. त्यानंतर कत्ती व ए.बी. पाटील यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून, फटाके फोडून जल्लोषात विजय साजरा केला.
“हुक्केरी तालुक्याच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केला, तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांना येथून हाकलू.माझा पुढील टप्पा निप्पाणी असणार आहे. तिथे मी स्वतः निवडणूक लढवीन,” असे विधान आमदार निखिल कत्ती यांनी केले.
त्यानंतर रात्री उशिरा डीजे साउंडवर तरुणांनी ठेका धरत, आनंद व्यक्त केला.


Recent Comments