नवरात्री उत्सवानिमित्त सवदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांचा महासागर यल्लम्मा डोंगर येथे शुक्रवारी लोटला होता. मुसळधार पावसाची तमा न बाळगता लाखो भाविकांनी सवदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी भव्य गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस पडत असतानाही डोंगर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या किंचितही कमी झाली नाही. कर्नाटक, महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. डोंगर मार्गाला जोडणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.
संततधार पावसातीदेखील भाविकांनी छत्री, रेनकोट चा आधार घेत रांगेत उभं राहून यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले.
रस्त्याच्या कडेला चूल मांडून स्वयंपाक करणाऱ्या भाविकांनाही पावसाने अडथळा निर्माण केला. त्यामुळे लोकांनी ताडपत्रीच्या साहाय्याने आडोसा निर्माण करून स्वयंपाक पूर्ण केला. भर पावसातदेखील आसपास मांडलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांची गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी पूजा साहित्यासह खेळणी आणि इतर साहित्याची दुकाने देखील थाटण्यात आली आहेत.
परंतु, दुसरीकडे पाहता भाविकांच्या संख्येच्या तुलनेत पोलिसांचा बंदोबस्त कमी असल्याचे दिसून आले.. नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते याची माहिती असूनही याठिकाणी मोजकेच पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असल्याने डोंगर मार्गावर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची निर्माण झाली होती. भाविकांच्या गर्दीत ‘उदो उदो’ च्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत संपूर्ण यलम्मा डोंगर भक्तिपूर्ण रसात न्हाऊन निघाला होता.


Recent Comments