Belagavi

पावसाची पर्वा न करता धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड

Share

बेळगावमध्ये पावसाची पर्वा न करता ६व्या दिवशी श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. धैर्य आणि भक्तीने परिपूर्ण असलेल्या दौडेमध्ये बालकांपासून ते वृद्धांपर्यंत हजारो नागरिक सहभागी झाले.

शनिवारी नवरात्र पर्वातील कात्यायिनी देवीच्या पूजेनंतर सदाशिवनगर येथील श्री हरिद्रा गणेश मंदिरापासून दौड सुरू झाली. प्रेरणामंत्र म्हणत ध्वजारोहनानंतर सदाशिवनगर मुख्य रस्ता, गणेश चौक, बेलदार छावणी, श्री मरगाइ मंदिर, नेहरूनगर, कोल्हापूर सर्कल, जवान क्वार्टर, सुभाषनगर, मराठा मंडळ रोड अशा मार्गांवर शिवकालीन वेशभूषेतील अनेकांनी दौडीचे आकर्षण वाढविले.

कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाची पर्वा न करता हजारो लोकांनी उत्साहाने दौड पूर्ण केली. या दौडीत आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.

गल्लोगल्ली या दौडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. गल्लोगल्ली भगव्या पताका, रांगोळ्या, शिवकालीन विशेभूषेतील बालचमू, महिला वर्गाने दौडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. पुष्पवृष्टी करत, आरती ओवाळून , शिवकालीन घोषणांनी परिसर दणाणून गेल्याने वातावरण शिवमय झाल्याचे दिसून आले.

रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी शहापूर येथील श्री अंबामाता मंदिरापासून दौडीला सुरूवात होऊन जगज्योती बसवेश्वर सर्कलमार्गे गोवावेस येथे सांगता होईल.

Tags: