बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीत मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पाण्यामुळे शेती पूर्णपणे जलमय झाली असून, पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

सवदत्ती तालुक्यातील एका शेतकऱ्याची ८ एकर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील चिक्क उळ्ळीगेरी गावातील शेतकरी सततच्या पावसाच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान सोसत आहेत. गावातील उमेश पुजार या शेतकऱ्याने नदीलगतच्या आपल्या ८ एकर जमिनीत उडदाचे पीक घेतले होते. परंतु, संततधार पावसामुळे जमीन पूर्णपणे जलमय झाली असून, उभे असलेले संपूर्ण उडदाचे पीक वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आणि राजकारण्यांनी कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने शेतकरी उमेश पुजार यांनी सरकारविरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला.
हिरेउळ्ळीगेरी, चिक्क उळ्ळीगेरी आणि इनामहोंगल मार्गे वाहणाऱ्या नदीचे पाणी शेतीत शिरल्यामुळे पिकांना फटका बसला आहे. शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्यास, पुढील जीवन जगणे खूप कठीण होईल, अशी असमाधानकारक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments