Belagavi

माजी सैनिकांना मोफत कायदेशीर सेवा उपलब्ध

Share

बेळगाव जिल्ह्यातील कार्यरत आणि माजी सैनिकांना, तसेच वीरपत्नींना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणांतर्गत मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा पुरवण्यास सुरुवात झाली आहे.

‘वीर परिवार सहायक योजना २०२५’ या नावाने सुरू झालेल्या या सेवेचा लाभ जिल्ह्यातील सर्व सैनिकांनी घ्यावा, असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पुजारी यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणांतर्गत सैनिक, माजी सैनिक आणि वीरपत्नींना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘वीर परिवार सहायक योजना २०२५’ या नावाने सेवा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व सैनिक, माजी सैनिक आणि वीरपत्नींनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पुजारी यांनी कळवले आहे.

या सेवेसाठी नुकतीच बेळगाव येथील सैनिक कल्याण आणि पुनर्वसन विभागात काम करण्यासाठी वकील अर्चना कोरगु यांची निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना महासंघाच्या पथकाने त्यांची भेट घेतली. यावेळी सैनिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी करायच्या उपायांवर वकिलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या योजनेंतर्गत सैनिक आणि माजी सैनिकांना कोणत्या प्रकारच्या सोयी-सवलती मिळतील, तसेच जिल्ह्यातील १४ तालुक्यांत या सेवेसाठी एकेका वकिलाची नेमणूक करण्यात आली आहे, याविषयी माहिती देण्यात आली. महासंघाच्या शिष्टमंडळाने वकिलांना अशी विनंती केली की, त्यांच्याकडे मदतीसाठी येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, कार्यरत सैनिक आणि वीरपत्नींना सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

बेळगावच्या सैनिक कल्याण आणि पुनर्वसन विभागात दर गुरुवारी वकील उपस्थित राहणार आहेत. सैनिक समाजाच्या समस्या सोडवण्याच्या या उत्तम कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांना महासंघाच्या वतीने गौरवून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुमिता पट्टणशेट्टी, महासंघाचे कोषाध्यक्ष संतोष हिरेमठ आणि सदस्य रुद्रप्पा गिड्डगोळ, सुभाष पाटील इत्यादी उपस्थित होते.

Tags: