बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्याच्या चिक्कबागेवाडी गावात शासकीय जागा पीकेपीएसला हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून झालेल्या पंचायत विकास अधिकारी यांच्या बदलीचा निषेध करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने तालुका पंचायत कार्यालयासमोर प्रखर आंदोलन करण्यात आले.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावात २ गुंठे शासकीय जागा ग्रामपंचायत पीडीओंनी अन्य व्यक्तीला हस्तांतरित केली होती. या आरोपावरून गावकरी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर, अधिकाऱ्यांच्या पाहणीत हे हस्तांतरण योग्य कागदपत्रांशिवाय झाल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर, चिक्कबागेवाडी ग्रामपंचायतीच्या पीडीओंची बदली करण्यात आली होती. २ गुंठे जागेवरील बांधकामावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला असला तरी, पीडीओंच्या बदलीचा हा निर्णय अचानक घेण्यात आला, असा आक्षेप घेत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या सदस्यांनी बैलहोंगल तालुका पंचायत कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
या विषयावर बोलताना बैलहोंगल तालुका पंचायतचे सहायक कार्यकारी अधिकारी संजीव जुन्नूर यांनी स्पष्ट केले की, कोणतीही शासकीय जागा दुसऱ्याला हस्तांतरित करण्यासाठी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत या तिन्ही ठिकाणी ठराव मंजूर होणे आवश्यक असते, परंतु या प्रकरणात केवळ ग्रामपंचायतीतच ठराव मंजूर झाला होता. असे त्यांनी स्पष्ट केले. या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान, अधिकाऱ्यांनी नेमकी माहिती देऊन आंदोलन संपवले. कागदपत्रांची अचूक तपासणी करून न्यायाच्या हक्कासाठी पात्र असलेल्यांना जागा दिली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले.
यावेळी, कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी आपले मत मांडले. “अधिकाऱ्यांनी योग्य कागदपत्रांची पडताळणी करून न्यायाच्या बाजूने असलेल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा.” असे त्यांनी म्हटले. तसेच, “येत्या नोव्हेंबर १ रोजी होणारा कर्नाटक राज्योत्सव या वेळी भव्य स्वरूपात साजरा केला जाईल,” असेही त्यांनी सांगितले.


Recent Comments