दसरा सणादरम्यान म्हैसूर आणि दक्षिण कर्नाटक भागात बाहुल्यांची मांडणी करण्याची प्रथा सर्वसामान्य आहे. उत्तर कर्नाटकात दसऱ्याला ही परंपरा सहसा पाळली जात नाही. मात्र, आता उत्तर कर्नाटकातही नवरात्रीदरम्यान बाहुली मांडणीचा हा ‘ट्रेंड’ सुरू झाल्याचे दिसत आहे. विजापूरमध्ये दसरा बाहुल्यांची मांडणी करण्यात आली असून, या बाहुल्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नवरात्री किंवा दसरा सणाच्या वेळी घरी बाहुल्यांची मांडणी करण्याची प्रथा आहे. विशेषतः जुन्या म्हैसूर भागात ही परंपरा अधिक लोकप्रिय आहे. पण, आता हीच प्रथा बसवनाडू विजापूर शहरात पाळली जात आहे.
बारा ज्योतिर्लिंगे, म्हैसूरचा चामुंडी डोंगर, महिषासुर, जम्बो सवारी यांसह म्हैसूर राजवाडा, रामायण, देवलोक आणि सत्पुरुषांच्या कथा सांगणाऱ्या बाहुल्यांची मांडणी केली आहे. इतकेच नव्हे तर या मांडणीतून आधुनिक जगाचेही चित्रण करण्यात आले आहे. विजापूर शहरातील संगमेश्वर कॉलनीतील निवृत्त बँक कर्मचारी महालींगप्पा जत्ती यांच्या घरी नवरात्रौत्सवानिमित्त ५०० हून अधिक बाहुल्यांची मांडणी करण्यात आली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने म्हैसूर दसऱ्याचा वैभव, रामायण, ७ स्तरांचे देवलोक, सत्पुरुषांच्या बाहुल्या, ग्रामीण भागाचा नमुना अशा अनेक रूपांत बाहुल्यांची मांडणी करण्यात आली आहे. एकूण ५०० बाहुल्यांच्या माध्यमातून जत्ती यांच्या घरी बाहुल्यांचे जगच निर्माण झाले आहे. यासंदर्भात या कुटुंबाने दिलेली अधिक माहिती जाणून घेऊयात.
निवृत्त बँक कर्मचारी महालींगप्पा यांच्या डोक्यात ही बाहुली मांडणीची कल्पना त्यांच्या पत्नीमुळे आली. म्हैसूर भागातील लोकांप्रमाणे नवरात्रीत बाहुल्यांची मांडणी करण्याची विजया यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी म्हैसूर, चन्नपट्टण, बेंगळुरू भागांतून फिरून या बाहुल्या खरेदी केल्या. यातून उत्तर कर्नाटक भागातही दसरा बाहुल्यांचा हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. या त्यांच्या कार्याला मुलगा आणि सुनेचेही सहकार्य लाभले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमावर बाहुली पाहण्यासाठी आलेल्या एका नागरिकांनी सांगितले की, विजया यांनी रामायण, महाभारत आणि पुराण कथा सांगणाऱ्या बाहुल्या आणून, पौराणिक कथांच्या क्रमाप्रमाणे त्यांची घरात मांडणी केली आहे. सणादरम्यान बाहुल्या पाहण्यासाठी येणाऱ्यांना या बाहुल्या स्वतःहून पौराणिक कथा सांगत असल्याचा अनुभव येतो. विशेषतः दसरा बाहुली मांडणीची माहिती मिळाल्याने जत्ती यांच्या घरी येणाऱ्यांना आणि बाहुलीप्रेमींना त्या बाहुल्या स्वतःच मनाला भिडणाऱ्या कथा सांगत आहेत की काय, असे वाटत आहे.
रामायण, महाभारत यासह अनेक प्रसंग या बाहुल्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले असून नवरात्रीच्या नऊ दिवसांत बाहुल्यांच्या सजावटीसोबतच घटस्थापनेपासून विजया दशमीपर्यंत देवीचे पारायणही चालते. बाहुल्यांची सजावट पाहण्यासाठी आलेल्या महिलांनी विजया यांनी केलेल्या मांडणीचे कौतुक करत आहेत. या भागात दसऱ्याला बाहुली मांडणी करणे दुर्मिळ असल्याने, विजापूर शहरातील अनेक भागांतून लोक जत्ती यांच्या घरी बाहुल्या पाहण्यासाठी येत आहेत.
एकंदरीत, नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या उद्देशाने हे कुटुंब बाहुलीची परंपरा पाळत आहे. विजापूर जिल्ह्यात प्रथमच बाहुली मांडणीची परंपरा पाळत असल्याने, आपल्या भावी पिढीला आपल्या परंपरेचे ज्ञान मिळावे, हा या कुटुंबाचा मुख्य उद्देश असल्याचे या कुटुंबीयांनी सांगितले आहे.


Recent Comments