

बेळगावमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री कुश्मांडादेवीच्या पूजनानंतर “श्री दुर्गामाता दौड” उत्साहात पार पडली.

ही दौड छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकातून सुरू होऊन किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, बसवाण गल्ली लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपती गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, मेणसे गल्ली, आझाद गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, पांगुळ गल्ली, कांदा मार्केट, कसाई गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेरी गल्ली, भडकल गल्ली अशी विविध भागांतून मार्गक्रमण करत पुढे सरकली. या सर्व मार्गांवर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
दौड सुरू होण्याआधी किरण गावडे यांनी भगवा रक्षक उभा केला आणि क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर संभाजी भिडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दुर्गामाता दौडेला प्रारंभ झाला. “या दौडीत सर्व बहुजन व हिंदू समाज सहभागी होतो. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम व धर्मरक्षणाची जाणीव जागवून, त्यांना व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करणे हे या दौडीचे ध्येय आहे,” असे संजय भातकांडे यांनी सांगितले. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
श्री दुर्गामाता दौड ही बेळगावमध्ये सामाजिक सौहार्दाचे प्रतीक मानली जाते. ७५ वर्षांवरील वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेकांनी यात सहभाग घेतला. “युवकांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढे यावे, आपले कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वांचा अंगीकार करून देव, देश आणि धर्माचे रक्षण करत सशक्त समाज घडवावा,” असे आवाहन विश्वजीत हसबे यांनी केले. अशी प्रेरणा त्यांनी दिली.
यानंतर दौड सरदार्स ग्राउंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरापर्यंत पोहोचून समाप्त झाली. हजारोंच्या संख्येने धारक यामध्ये सहभागी झाले होते. उद्या २६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दौड खासबाग येथून सुरू होऊन विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत वडगाव येथील श्री मंगाई मंदिरात समाप्त होईल.


Recent Comments