Dharwad

धारवाडमध्ये विद्यार्थ्यांचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

Share

सरकारी खात्यांतील रिक्त पदे भरण्यासाठी धारवाड येथे विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी राज्य सरकारविरोधात विराट मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.

अखिल कर्नाटक राज्य विद्यार्थी संघाच्या नेतृत्वाखाली धारवाड येथील लिंगायत भवनापासून शहराच्या मध्यभागी असलेल्या जुबली सर्कलपर्यंत विद्यार्थ्यांनी हा विराट मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे एक हजाराहून अधिक तरुण सहभागी झाले होते, ज्यामुळे जुबली सर्कल पूर्णपणे बंद पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री परमेश्वर यांचे छायाचित्र हातात घेऊन राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये अनेक वर्षांपासून कोणतीही भरती प्रक्रिया झालेली नाही. विद्यमान सरकार मागील सरकारकडे बोट दाखवत केवळ वेळकाढूपणाचे धोरण न राबवत असून सरकारने त्वरित भरती प्रक्रिया राबवून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करावा आणि बेरोजगारी दूर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्याचबरोबर, भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यादरम्यान, जुबली सर्कलवर विविध काँग्रेस नेत्यांनी सणांच्या शुभेच्छा देणारे लावलेले फलक देखील फाडून विद्यार्थ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

Tags: