Belagavi

बेळगावमधील भीषण खून प्रकरणी दोघांना जन्मठेप आणि एक लाख रुपयांचा दंड

Share

काही वर्षांपूर्वी बेळगावात एका पार्टीदरम्यान डीजेचा आवाज कमी करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांतर्गत दोघांना द्वितीय जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शशिकुमार रामाप्पा उद्दाप्पगोळ (वय २१, रा. हिडकल डॅम, हुक्केरी) आणि नवीन चंद्रा शेट्टी (वय ३०, रा. कोडूर, ता. होसनगर, जि. शिमोगा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. २०१९ साली साई लॉजमध्ये आयोजित एका पार्टीमध्ये ही घटना घडली होती. या घटनेनंतर मार्केट पोलिसांनी तपास करून तिघांविरोधात गुन्हा नोंदवला होता. या खून प्रकरणात एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर स्वतंत्र खटला चालवण्यात आला. उर्वरित दोघांवर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली.

बेळगावातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई लॉजमध्ये एका पार्टीत डीजे लावण्यात आला होता. याच डीजेच्या आवाजावरून मृत विनायक रायबागकर आणि वरील तिघा संशयितांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान एका संशयिताने विनायकला घट्ट पकडले, तर इतर दोघांनी त्याच्या डोक्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. त्यानंतर त्याला जोरात ढकलल्याने तो भिंतीवर आदळला. एवढेच नाही, तर त्याला मारहाण करून त्याचा गळाही दाबण्यात आला. या घटनेत विनायकचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

सुरुवातीला मार्केट पोलिसांना हा खुनाचा गुन्हा असल्याची माहिती मिळाली नव्हती. मात्र, घटनास्थळाची पाहणी, चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित आणि मृत असे चौघे जण आत गेल्याचे आणि परत येताना तिघेच बाहेर आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास केला आणि संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर येथील द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यावेळी साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आले. या पुराव्यांवरून दोघेही दोषी आढळले. त्यामुळे न्यायाधीशांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून भारती होसमनी यांनी काम पाहिले.

या खुनाच्या घटनेनंतर मार्केट पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शरद खानापुरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक पुरावे गोळा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. विनायक रायबागकरचे डोके भिंतीवर आदळल्याने तिथे रक्ताचे डाग पडले होते. खानापुरे यांनी त्याचे नमुने घेऊन न्यायविज्ञान प्रयोगशाळेत पाठवले. तसेच, आरोपींनीच हा खून केला हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी खानापुरे यांचे विशेष अभिनंदन केले. तत्कालीन मार्केटचे एसीपी आणि सध्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी असलेले एन. व्ही. बरमनी यांनी त्यावेळी खून झालेल्या लॉजला भेट देऊन पाहणी केली होती.

Tags: