कागवाड तालुक्यातील उगार गावात ग्रामदेवता आणि अतिशय जागृत देवस्थान असलेल्या श्री पद्मावती मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पद्मावती मंदिर समितीच्या सदस्यांनी आणि धर्माधिकारी शीतल गौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नऊ दिवस विविध अलंकार पूजा, अर्चना आणि अभिषेक आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. घटस्थापनेनिमित्त बंगळुरूहून १०८ कमळांची फुले मागवून देवीला विशेष अलंकार पूजा करण्यात आली. रोज देवीला अलंकार पूजा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जात आहे.
दररोज सायंकाळी पद्मावती आदर्श महिला मंडळाद्वारे दांडिया रास, गरबा नृत्य आणि भक्तिगीत गायन असे अनेक कार्यक्रम पार पडत आहेत. महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई पासगौडा पाटील, सविता कलगौडा पाटील, कांचन पाटील, स्नेहल पाटील, दिपाली पाटील, सुषमा अलतगे यांच्यासह अनेक महिला भक्त रोज या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.
मंदिराचे धर्माधिकारी शीतल पाटील यांनी सांगितले की, नऊ दिवसांच्या नवरात्री पूजेनंतर बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी मंदिरात अलंकार पूजा करून भव्य मिरवणुकीने कृष्णा नदीवर नेले जाईल आणि तिथे जवळपास तीन तास पूजा केली जाईल.
भक्तांनी अर्पण केलेले नारळ, दूध, दही, तूप आणि फळे यांचा उपयोग पार्श्वनाथ मूर्तीची पूजा करून नदीत अर्पण करण्यासाठी केला जातो. उरलेली साखर आणि गूळ प्रसाद म्हणून भक्तांना वाटली जात आहे. संध्याकाळी शमी उल्लडणेचा पवित्र कार्यक्रमही होणार आहे.
Recent Comments