Dharwad

युट्युबर पती-पत्नीचा नवा खुलासा; ‘लव्ह जिहाद’चे आरोप खोटे

Share

समाजमाध्यमांवर सध्या गाजत असलेल्या यूट्यूबर्स मुकळेप्पा आणि गायत्री यांच्या विवाहावर सुरू असलेल्या वादावर या जोडप्याने अखेर मौन सोडले आहे. ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांचे खंडन करत, दोघांनीही हे आरोप खोटे असल्याचे सांगितले असून, ते आपापल्या धर्माचे पालन करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध यूट्यूबर्स ख्वाजा शिरहट्टी ऊर्फ मुकळेप्पा आणि त्याची पत्नी गायत्री जालीहाळ यांच्या लग्नावरून वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, त्यांनी या सर्व खोट्या बातम्यांना स्पष्टीकरण दिले आहे.

“मी माझ्या धर्माचे पालन करत राहीन आणि गायत्री तिच्या धर्माचे पालन करेल. ‘लव्ह जिहाद’चा आरोप पूर्णपणे खोटा आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम केले आणि परस्परांच्या संमतीने लग्न केले आहे,” असे मुकळेप्पा यांनी स्पष्ट केले. “मी एक कन्नडिगा असून, एक हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. कोणीही आमचा धर्म बदललेला नाही,” असे त्यांनी म्हटले.

गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात असल्याची माहिती गायत्री जालीहाळ यांनी दिली. “माझ्यावर कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव किंवा जबरदस्ती करण्यात आलेली नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांवर प्रेम करून लग्न केले आहे. आम्ही आमच्या इच्छेने घेतलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढू नका,” असे आवाहन त्यांनी केले.

या जोडप्याने नागरिकांना समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. “आमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करू नका. आम्हाला शांततेत जगू द्या,” असे आवाहन त्यांनी हात जोडून केले आहे.

Tags: