बेळगावमधील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करण्याच्या विरोधात आज शेतकऱ्यांनी महापालिका कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

परवाना रद्द झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीवर झोपून आपला निषेध व्यक्त केला. ‘अधिकारी शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि भावनांचा विचार करायला हवा. खासगी ‘जय किसान मार्केट’ पाडण्याचा तुम्हाला अधिकार काय?’ असे संतप्त शेतकऱ्यांनी म्हटले. ‘अनेक ठिकाणी सरकारी जमिनींवर अतिक्रमण झाले आहे, आधी ते हटवून दाखवा,’ असे आव्हान शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांनी दिले. ‘बेळगाव हा मोठा जिल्हा असून, येथे दोन बाजारपेठांची आवश्यकता आहे. ‘जय किसान मार्केट’ हे शुल्क भरून अधिकृतरीत्या उभारले आहे. बस स्थानकाजवळची अनधिकृत इमारत पाडून दाखवा,’ असेही आव्हान त्यांनी दिले.
यावेळी कित्तूर, सवदत्ती, बैलहोंगल आणि यरगट्टी येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, ‘आम्हाला आमचे उत्पादन दूरवरून बाजारपेठेत आणावे लागते आणि कामगारही मिळत नाहीत. कर्नाटक राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या जिल्ह्यात दोन बाजारपेठांची गरज आहे. जर खासगी ‘जय किसान मार्केट’ला दुसरी बाजारपेठ म्हणून घोषित करून ते पुन्हा सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन करू,’ असा इशारा त्यांनी मंत्री शिवानंद पाटील यांना दिला.
यावेळी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारताना महापालिका आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, ‘या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल.’ असे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments