बेळगावमधील सदाशिवनगर येथील डाॅ. बी.आर. आंबेडकर शासकीय मॅट्रिकोत्तर मुलींच्या वसतिगृहात एका नर्सिंग विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव सुमित्रा गोकाक (१९) असे आहे. ती मूळची विजापूर जिल्ह्यातील रहिवासी होती. सुमित्राने आज सकाळी नाश्ता केल्यानंतर आपल्या खोलीत जाऊन आतून दरवाजा बंद केला आणि गळफास लावून घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. सुमित्रा ही एक महिन्यापूर्वीच नर्सिंगच्या शिक्षणासाठी वसतिगृहात दाखल झाली होती.
या प्रकरणाच्या संदर्भात, समाज कल्याण विभागाचे सह-संचालक रामनगौडा कन्नोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “सुमित्रा वीस दिवसांपूर्वीच वसतिगृहात राहायला आली होती. आज सकाळी ती सर्वांशी व्यवस्थित बोलत होती. पण त्यानंतर तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि प्रतिसाद दिला नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणींना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, ही घटना समोर आली. पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावरच सत्य बाहेर येईल,” असे त्यांनी म्हटले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील कारवाई सुरू केली आहे.


Recent Comments