Belagavi

बेळगाव दक्षिणमध्ये एल अँड टी कंपनीचा निष्काळजीपणा

Share

आज सकाळी बेळगाव दक्षिणमध्ये एल अँड टी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. आमदार अभय पाटील यांनी तातडीने लक्ष घातल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आणि गॅस पाइपलाइन पूर्ववत झाल्यामुळे स्थानिक लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात आज सकाळपासूनच भूमिगत गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. अनेक गृहिणींना सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी अडचणी आल्या. याबाबतची माहिती आमदार अभय पाटील यांना मिळताच, त्यांनी लगेच मेघा गॅसशी संपर्क साधला. तेव्हा, एल अँड टी कंपनीच्या विकासकामांदरम्यान गॅस पाइपलाइनला धक्का लागल्याचे समोर आले. यानंतर सकाळीच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आता सर्व जोडण्या दुरुस्त झाल्या असून, गॅस पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे.

“विकासकामे करताना मेघा गॅसच्या पाइपलाइनकडे लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा आमदार अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीला दिला आहे.

आमदार अभय पाटील यांनी सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून, सायंकाळपर्यंत पूर्ण होणारे काम काही तासांत पूर्ण करून घेतले. याशिवाय, त्यांनी या भागातील सुमारे ५०० लोकांसाठी सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: