Belagavi

गांजा विक्रेत्याला ५ वर्षांची सक्तमजुरी; ५० हजार रुपयांचा दंड

Share

बेळगाव शहरातील सी.ई.एन. क्राईम पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात, गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ५ वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

२००८ पासून दाखल झालेल्या एनडीपीएस कायद्याच्या प्रकरणांमध्ये बेळगावात झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. या प्रकरणी, दिनांक ०३-१०-२०२४ रोजी पीएसआय बी. जी. घंटामठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धारवाड येथील सत्तूर आश्रय कॉलनीमधील समीर राजेसाब लत्तेण्णावरच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्याकडून १ किलो २२ ग्रॅम गांजा, ज्याची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये आहे, जप्त करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बी. आर. गद्देकर यांनी या प्रकरणाचा तपास करून, दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी करून, बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी १५-०९-२०२५ रोजी आरोपीला ५ वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या प्रकरणात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तपास अधिकारी बी. आर. गद्देकर, पी.एस.आय. व्ही. जी. घंटामठ आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. यामध्ये एल. एस. चिनगुंडी (एएसआय), एन. जे. मादार (सीएचसी १०९२), एम. डी. यादवाड (सीएचसी १२२९), के. व्ही. चरंगमठ (सीएचसी १३२२), व्ही. एन. बडवण्णावर (सीएच १२२९), ए. एस. कोरिशेट्टी (सीएच १४९), मारुती एल. कोन्यगोल (सीएच ७१३) आणि एस. एल. अज्जप्पण्णावर (सीएचसी ११०३) आणि पी. टी. दासर (सीपीसी १७४९) यांचा समावेश आहे.

Tags: