पैगंबर मोहम्मद यांनी संपूर्ण जगाला दिलेला शांतता आणि सलोख्याचा संदेश सर्वांनी अंगीकारायला हवा, असे आवाहन बिहारचे खासदार गुलाम रसूल यांनी केले.

पैगंबर मोहम्मद यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त मजलीस सुन्नद आणि अंजुमन इस्लामच्या वतीने बेळगाव शहरात ‘ईद-ए-मिलाद’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे खासदार गुलाम रसूल बालियावी, कवी असद इक्बाल कलकतवी, माजी आमदार फिरोज सेथ, आमदार आसिफ सेथ यांच्यासह जिल्ह्यातील धर्मगुरू आणि हजारो लोक उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार गुलाम रसूल म्हणाले की, ‘आज जगभरात पैगंबर मोहम्मद यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. त्यांची शिकवण आणि मानवी मूल्ये संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत. आजही त्यांच्यावर संशोधन सुरू आहे, मात्र, सध्या समाजातील काही लोक ही मूल्ये बाजूला ठेवून डीजेच्या तालावर मिरवणुका काढत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कवी असद यांनी आपल्या कवितांमधून पैगंबर मोहम्मद यांचे संदेश सादर केले.
आमदार आसिफ सेथ यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ‘पैगंबरांनी दाखवलेल्या मार्गावर सर्वांनी चालले पाहिजे. त्यांनी संपूर्ण मानवजातीला दिलेल्या संदेशांनुसार जीवन जगले पाहिजे. १५०० वर्षांपासून पैगंबरांनी दाखवलेला मार्ग आपल्याला स्वीकारायचा आहे. समाजात निर्माण झालेल्या दुहीमुळे आज जगभरात युद्धे होत आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी काझी नसरुल्ला, मौलाना साद अहमद हाश्मी, शोएब शहापुरी, मौलाना सरवर, मौलाना अल्लाहुद्दीन कादरी, मौलाना असद आणि हाफिज अजर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments