अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील शहाबंदूर गावात घडली आहे.

महांतेश बूकनट्टी (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. कामावरून परत येत असताना बसमधून खाली उतरल्यावर आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कामावरून परतल्यानंतर बसमधून उतरून घराकडे जात असतानाच आरोपींनी दबा धरून बसले होते. महांतश दिसताच त्यांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मृताच्या भावाने आणि मामांनी या हत्येवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अनैतिक संबंध चुकीचा असला तरी, कोणाचीही हत्या करणे चुकीचे आहे. आमच्या कुटुंबाचा आधार असलेल्या मुलाची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर आधीपासूनच दादागिरी करत होते. या खुन्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
हा वाद एक वर्षापूर्वी समोर आला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी आणि ज्येष्ठांनी मध्यस्थी करून दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणला होता, अशी माहिती मोदीनसाब ताशीलदार यांनी दिली. “एका वर्षापूर्वी वाद मिटला असताना आता अचानक खून का केला, हे समजत नाही,” असे त्यांनी म्हटले.
मृत तरुण महाविद्यालयात नोकरी करत होता. तो कामावरून घरी परत येत असतानाच त्याची हत्या झाली, अशी माहिती त्याचा भाऊ सोमेश बूकनट्टी याने दिली. “एक वर्षापूर्वी बूकनट्टीने पत्नीला फोन केल्यामुळे बासवेश्वर आणि त्याच्यामध्ये भांडण झाले होते, पण त्यानंतर प्रकरण मिटले होते,” असे त्याने म्हटले. या प्रकरणी यमकनमराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments