हिंदू समाजातील जातींमध्ये ख्रिस्ती समाजाचा समावेश करण्याचा सरकारचा प्रयत्न हा एक वेडेपणा असून, हिंदू जागृत वेदिकेने याचा तीव्र निषेध केला आहे. या संदर्भात, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि भाजप नेते एम.बी. जिरली यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली.

बेळगाव मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महांतेश कवटगीमठ म्हणाले की, “राज्य सरकारने जातीजनगणनेत सर्व हिंदू समाजांमध्ये ख्रिस्ती समाजाचा समावेश करून धोकादायक पाऊल उचलले आहे. हिंदू समाजाच्या अनेक जातींच्या गणनेत ‘ख्रिस्ती’ या शब्दाचा वापर केल्याचा आम्ही निषेध करतो,” अशा शब्दात त्यांनी सरकारचा निषेध केला.
वक्कसाली, बंजारा, गोल्ला, जंगम, कुरूब, लमाणी, मांग, विणकर, रेड्डी, शेट्टर, वाल्मिकी यांच्यासह ४६ जातींच्या नावापुढे ‘ख्रिस्ती’ जात नोंदवण्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या चुकीच्या निर्णयावर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एम. बी. जिरली पुढे म्हणाले, “संविधानात सामाजिक न्याय मिळवण्यासाठी आरक्षण खूप महत्त्वाचे आहे. समाज कल्याण विभागाने सर्वेक्षण करून सरकारला अहवाल देणे अपेक्षित आहे. मात्र, राज्य सरकारने कांताराजू अहवाल स्वीकारण्यास नकार दिला आहे. सर्वेक्षणाला आमचा विरोध नाही, पण धर्मांतरबंदीचा कायदा लागू असूनही सरकार जातीजनगणनेच्या नावाखाली धर्मांतर घडवण्याचा कट रचत आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महात्मा गांधी भवन येथे सर्व समाजातील नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर, राज्यपालांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विनोद दोड्डण्णावर, ईरणा दयानंदवर, दिगंबर पवार, महादेव राठोड, संदीप जिरग्याळ, रोहन जवळी, राजेंद्र मुतगेकर, आर. एस. मुतालिक, अनंत लाड, चंद्रशेखर सवदी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments