Dharwad

धारवाडमध्ये दूषित पाणी प्यायल्याने नागरिक आजारी

Share

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यात दूषित पाणी प्यायल्याने अनेक नागरिक आजारी पडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार एन.एच.कोनरेड्डी यांनी तातडीने रुग्णालयात आणि गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

गेल्या बुधवारी नवलगुंद तालुक्यातील गुडीसागर गावात तलावाचे पाणी प्यायल्यानंतर काही लोक उलटी आणि जुलाबामुळे आजारी पडले आणि त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नवलगुंदचे आमदार एन.एच.कोनरेड्डी यांनी तातडीने तालुक्याच्या रुग्णालयात आणि गावाला भेट देऊन आजारी लोकांच्या आरोग्याची चौकशी केली आणि गावाची पाहणी केली.

नवलगुंद विधानसभा मतदारसंघाचे आमदार एन.एच.कोनरेड्डी, जिल्हाधिकारी दिव्या प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनिश पाटील आणि एसपी गुंजन आर्य यांनी नवलगुंद येथील तालुक्याच्या रुग्णालयाला भेट देऊन आजारी लोकांसोबत संवाद साधला. त्यांनी घटनेची माहिती घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी, आमदार एन.एच.कोनरेड्डी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘गावाला वेळेवर शुद्ध पाणीपुरवठा करावा. तसेच, स्वच्छता आणि शुद्ध पाण्याबद्दल ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करावी.’ रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांना उत्तम उपचार आणि मोफत औषधे देण्याचे निर्देशही आमदारांनी डॉक्टरांना दिले.

Tags: