Belagavi

विसर्जन मिरवणुकीतील मराठी गाण्यांचाही कन्नड संघटनांना त्रास!

Share

बेळगावमध्ये लांबत चाललेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे नागरिकांची होणारी गैरसोय तसेच, विसर्जन मिरवणुकीत मराठी गाणी लावणाऱ्या समिती कार्यकर्त्यांना बेळगावातून हद्दपार करावे, अशा गजब मागणीसाठी जय कर्नाटक संघटनेने आज बेळगावमध्ये आंदोलन केले. मराठी गाण्यांवर नाचणाऱ्या महापालिका आयुक्तांच्या कृतीचाही संघटनेने निषेध केला.

आज जय कर्नाटक संघटनेने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.

बेळगाव शहरात सार्वजनिकरित्या बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन काही गणेश मंडळांनी ११व्या दिवसाऐवजी १३व्या दिवशी केले, ज्यामुळे विसर्जन तलावाजवळील व्यापारी, गरीब आणि सामान्य नागरिकांना त्रास झाला. जिल्हा प्रशासनाने कपिलेश्वर तलावाचे रुंदीकरण करावे. तसेच, बेळगाव उत्तर आणि ग्रामीण भागात मोठे तलाव बांधल्यास तेथील गणेश मूर्तींचे विसर्जन तिथेच होईल आणि सामान्य लोकांना त्रास होणार नाही. दरवर्षी गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत असून सध्या ही संख्या ४२० झाली आहे. यामुळे पोलिसांनाही सेवा देण्यासाठी अडचण येत आहे. काही मंडळांना अद्यापही शहाणपण आलेले नाही. त्यांनी गणपतीच्या नावाखाली राजकारण करणे बंद करावे. बेळगाव महापालिकेच्या आयुक्तांनी हे रोखण्याऐवजी त्यांच्यासोबत मराठी गाण्यांवर ताल धरला असून काही ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठी गाणी लावून नाच केला आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना हद्दपार करावे, अशी विचित्र मागणीहि जय कर्नाटक संघटनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष संजय राजपूत यांनी केली.

जय कर्नाटक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता मराठी गाण्यांवरूनही नवा वाद जाणीवपूर्वक उकरून बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सव मिरवणुकीचे राजकारण सुरु केले आहे. बेळगावमधील गणेशोत्सव हा आजवर सर्वसमावेशक पद्धतीने साजरा केला जात असून अशा नव्या पालव्या फुटणाऱ्या संघटनांनी बेळगावचा सांस्कृतिक इतिहास तपासून पाहावा, तसेच असे नवनवे वाद उकरून काढून बेळगावची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.

Tags: