म्हैसूर दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी बानू मुश्ताक यांना सरकारने निमंत्रण दिल्याच्या निषेधार्थ ‘हमारा देश’ संघटना, ‘हिंदू जनजागृती समिती’ आणि ‘राष्ट्र रक्षा दला’च्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये बुधवारी जोरदार निदर्शने केली.

हिंदू धर्म स्वीकारून त्या उद्घाटनाला आल्या तर त्यांचे स्वागत आहे, अन्यथा त्यांनी माघार घ्यावी, अशी मागणी करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
म्हैसूर दसरा हा सनातन हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी बानू मुश्ताक यांना निमंत्रण देणे योग्य नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. ‘हमारा देश’ संघटनेचे मल्लिकार्जुन कोंकणी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “बानू मुश्ताक यांनी अद्याप राज्याचे गीत, ध्वज किंवा देवता स्वीकारलेली नाही. त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीही स्वीकारलेली नाही. अशा व्यक्तीकडून राज्याच्या दसरा महोत्सवाचे उद्घाटन करणे योग्य नाही.”
कोंकणी पुढे म्हणाले, “जर बानू मुश्ताक यांनी हिंदू धर्म स्वीकारून दसरा महोत्सवाचे उद्घाटन केले, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, त्यांनी असे न केल्यास त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करू नये. सरकारनेही या निर्णयावर पुनर्विचार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments