युवा सबलीकरण आणि क्रीडा विभाग, कर्नाटक येथील ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील यांची आगामी कनिष्ठ आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप २०२५ साठी भारतीय ज्युडो संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

भारतीय ज्युडो महासंघ आणि भारत सरकारच्या क्रीडा प्राधिकरणाने संयुक्तपणे ही नियुक्ती केली आहे. ही स्पर्धा १० ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात होणार आहे.
रोहिणी पाटील यांनी २०१४ पासून भारतीय ज्युडो संघाला सातत्याने योगदान दिले आहे. यापूर्वी त्यांनी कझाकिस्तान, चीन आणि तैवान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. खेळाडू म्हणून त्यांची कामगिरीही तितकीच प्रभावी आहे. त्यांनी दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप, राष्ट्रीय खेळ, तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. याशिवाय त्या अनेक वेळा राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या ठरल्या आहेत. त्यांना प्रतिष्ठेच्या एक्लव्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. रोहिणी पाटील यांच्याकडे दुसरी ‘डॅन ब्लॅक बेल्ट’ असून, त्या भारतीय ज्युडो महासंघाच्या ‘ए’ ग्रेड राष्ट्रीय पंच म्हणूनही प्रमाणित आहेत.
सध्या त्या बेळगाव येथील युवा सबलीकरण आणि क्रीडा विभागाच्या इनडोअर हॉलमध्ये अनेक युवा खेळाडूंना आगामी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण देत आहेत. यासाठी त्यांना उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे सातत्यपूर्ण सहकार्य मिळत आहे.


Recent Comments