Kagawad

उगार साखर कारखान्याच्या गणपतीचे थाटामाटात विसर्जन

Share

कागवाड तालुक्यातील उगार खुर्द शहरामधील साखर कारखान्याचा ८२वा गणेशोत्सव अत्यंत भव्यदिव्य आणि उत्साहात साजरा झाला. विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून आणलेल्या १८ हजार गंगाजलच्या बॉटल्स आणि १८ हजार लाडूंचे भक्तांना वाटप करण्यात आले. शनिवारी सायंकाळी उगार साखर कारखान्याच्या गणपतीचे विसर्जन भक्तिपूर्ण वातावरणात पार पडले. साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंदन शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली यावर्षीचा गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या गणेश भक्तांना गंगाजल आणि लाडू वाटण्यात आले. मिरवणुकीत मिरज येथील समर्थ प्रतिष्ठानच्या ४६ कलाकारांच्या ढोल-ताशा पथकाने विशेष कार्यक्रम सादर केला. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांचे झांज पथक, माऊली भक्ती मंडळाचे भजन-वादक पथक, साखर कारखान्याचे अधिकारी आणि महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

यावेळी साखर कारखान्याचे उद्योजक प्रफुल्ल शिरगावकर, स्मिताताई शिरगावकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा राधिकाताई शिरगावकर, गीताताई शिरगावकर यांच्यासह साखर कारखान्याचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

Tags: