रायबाग मतदारसंघातील जनतेच्या मागणीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली.

बुधवारी रायबाग तालुक्यातील भेंडवाड, रायबाग आणि जलालपूर गावांमध्ये डांबरीकरणाच्या कामांचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “४ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीतून भेंडवाड-मेखळी रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण आणि पथदिवे बसवण्याचे काम केले जाईल. तसेच, ७० लाख रुपयांच्या निधीतून मंटूर-कटकभावी-देवापूरहट्टी रस्त्याचे डांबरीकरण, १२ कोटींच्या निधीतून रायबाग-कंकणवाडी रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण, तर जलालपूर गावात ३ कोटी रुपयांच्या निधीतून भिरडी-बावनसौंदत्ती रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. रस्त्यांच्या सुधारणेसोबतच रात्रीच्या वेळी नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला पथदिवेही बसवले जातील.”
आमदार डी.एम. ऐहोळे यांनी या वेळी सांगितले की, “आमच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग मतदारसंघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामीण भागातील लोकांनी रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी सहकार्य करावे, जेणेकरून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती होईल.”
याप्रसंगी डीसीसी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते, ग्रा.पं. अध्यक्षा अनिता दुपदाळे, प.पं. अध्यक्ष अशोक अंगडी, जलालपूर ग्रा.पं. अध्यक्षा दीपा चौगला, पीडब्ल्यूडीचे एईई आर.बी. मनवड्डर, सदाशिव घोरपडे, सिद्राम पुजारी, शिवनगौडा पाटील, सिद्धू बंडगर, राजू शिरगांवे, सुरेश चौगला, राजू जगदाळे, नामदेव कांबळे, बसवराज अव्वन्नवर, निर्मला पाटील, अर्जुन नायिकवाडी, अर्जुन बंडगर, अण्णासाहेब समाजे, विवेक हट्टीकर, रियान नदाफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments