Kagawad

कागवाडमध्ये ‘प्रजासौध’ इमारतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

Share

कागवाड तालुक्यात सरकारी विभागांची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रजासौध इमारत बांधण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. या इमारतीसाठी जागेची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे. येत्या एका महिन्यात सर्व व्यवस्था करण्यात येईल, असे बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कागवाड येथे सांगितले.  जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार कागवाडला येऊन त्यांनी प्रजासौधसाठी जागेची पाहणी केली. सध्या पाऊस जास्त असल्याने पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर आठवड्यातून एकदा येथील जागेची माती तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी एम. एस. मगदूम यांना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तहसीलदार रवींद्र हादिमनी यांना प्रजासौध इमारतीच्या जागेची संपूर्ण माहिती घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी प्रजासौध इमारतीबाबत आपली भूमिका मांडली. “या इमारतीसाठी ८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, कोणत्या अधिकाऱ्याने वरिष्ठांना चुकीची माहिती दिली हे मला माहीत नाही. येथे काळी माती असून, पाणी धरून ठेवते, असे त्यांना सांगण्यात आले आहे. पण, आम्ही निवडलेल्या जागेच्या बाजूला अनेक वर्षांपासून शाळांच्या इमारती बांधल्या आहेत आणि तेथे विद्यार्थी शिकत आहेत. त्या इमारतींना काहीही त्रास होत नाही. याविषयी मी सरकारला माहिती दिली आहे. मी एक जबाबदार आमदार म्हणून काम करत आहे आणि सरकारला चुकीची माहिती देणार नाही. जर इमारतींना काहीही अडचण आली तर त्याची जबाबदारी मी घेईन, अशीही ग्वाही दिली आहे. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करतील आणि महसूल मंत्र्यांना माहिती देतील,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी कागवाड वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि न्यायालयीन इमारतीसाठी मंजूर केलेल्या २ एकर जागेची पाहणी करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच जागेची पाहणी केली.

राज्य महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, बेकायदेशीरपणे खड्डे खोदून मातीचा वापर केला जात असल्याचा आरोपही वकिलांनी केला. तसेच, स्थानिक वाहनधारक कर्नाटकातील लाकूड महाराष्ट्रात जास्त किमतीत नेत असल्याच्या तक्रारीही त्यांनी केल्या. यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रेड-२ तहसीलदार रश्मी जकाती, उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे, पीएसआय राघवेंद्र खोत, अनेक अधिकारी, शाळेतील शिक्षक, वकील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: