गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांच्या नेतृत्वाखाली 400 हून अधिक ड्रग्ज पेडलर्स आणि व्यसनींची परेड काढण्यात आली. सणासुदीच्या काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक उपाय केला आहे.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले की, सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही आवश्यक ती तयारी केली आहे. हुबळी-धारवाडमधील अनेक गुन्हेगारांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्जची तस्करी आणि सेवन करणाऱ्यांना एकत्र करून त्यांची परेड घेतली जात आहे. माझ्या कार्यकाळात 1,800 पेक्षा जास्त लोकांची तपासणी केली असून, त्यापैकी 900 हून अधिक लोक ड्रग्जचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 200 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत, ज्यात 90 पेडलिंगच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. 2024-25 या वर्षात 80 हून अधिक गुन्हे दाखल करून 250 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, यावर्षी 105 लोकांना शहरातून हद्दपार केले असून, त्यात 19 ड्रग्ज पेडलर्सचा समावेश आहे. त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना माहिती देण्यात आली आहे. या लोकांकडून सणांच्या काळात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ही परेड आयोजित केली आहे. एकूण 900 पेक्षा जास्त लोक आहेत, ज्यापैकी 400 लोकांना आज परेडसाठी आणले होते. परेडची माहिती मिळताच काहीजण पळून गेले आहेत, असेही शशिकुमार यांनी सांगितले.


Recent Comments