महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. कोयना धरणातून एक लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असल्याने चिकोडीतील नद्यांमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कृष्णा नदीच्या तीरावर पुराची भीती वाढत आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे चिकोडी उपविभागातील कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या तीरावर पूर येण्याची भीती आहे.
महाराष्ट्रातील धरणे भरल्याने कोयना धरणातून एक लाख क्युसेक, वारणा धरणातून ३६ हजार क्युसेक, राधानगरी धरणातून १५ हजार क्युसेक आणि काळम्मावाडी धरणातून २० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.
यामुळे उद्यापर्यंत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकात येण्याची शक्यता आहे. सध्या कृष्णा नदीत ९९ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ही आवक १ लाख ७५ हजार क्युसेकपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पाऊस वाढल्याने महाराष्ट्र सरकारने पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सध्या अलमट्टी धरणातून २ लाख क्युसेक पाणी सोडले जात आहे. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्नाटकच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून, पूर व्यवस्थापनासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


Recent Comments