‘शिक्षक हे देश घडवणारे अभियंते आहेत, ते देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही घडवण्याचे काम करतात,’ असे मत बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना महासंघाचे अध्यक्ष जगदीश पुजेरी यांनी व्यक्त केले.

चिकोडी तालुक्यातील कुप्पानवाडी येथील विश्व शिक्षण संस्थेच्या मुरुघेंद्र निवासी शाळेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात १०८ माजी सैनिकांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ‘बेळगाव जिल्ह्यामध्ये ३६ हजार माजी सैनिक आहेत. अशा संघटनांकडून सैनिकांना पाठबळ देण्याचे काम केले पाहिजे,’ असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित असलेल्या चिकोडीचे संपादना स्वामीजी म्हणाले, “सैनिकांची सेवा आणि त्याग प्रशंसनीय आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवलेल्या विश्व शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.पी. धरिगौडर म्हणाले, “देशाचा मजबूत पाया तयार करण्यासाठी सैनिक, शिक्षक आणि शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.”
कुप्पानवाडीच्या श्रद्धा धर्मराज खोत फाउंडेशन, निपाणी आणि कुप्पानवाडीच्या रायत पीयू कॉलेज यांच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १०८ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पी. के. असोसिएट्स माजी सैनिक महिला युनिटच्या बेळगाव जिल्हा युनिटच्या अध्यक्षा सविता पट्टणशेट्टी, रमेश चौगला, संस्थेच्या संयोजक कविता धरिगौडर, मुरुगेश धरिगौडर, श्रद्धा खोत, रवींद्र अलगूरे, कलिंग श्रेणिक खोत, मुरुघेंद्र निवासी शाळेच्या सीईओ सृष्टी धरिगौडर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अजय मादिगा यांनी स्वागत केले, पंकज हालप्पगोळ यांनी सूत्रसंचालन केले आणि अमृता खोत यांनी आभार मानले.


Recent Comments