Savadatti

पश्चिम घाटात मुसळधार पाऊस; नाविलुतीर्थ धरणातून पाण्याचा विसर्ग

Share

पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत असून, यामुळेच बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळीजवळील नाविलुतीर्थ धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्याने, प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ४ हजार क्युसेक पाणी नदीत सोडले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम घाटात पाऊस सुरू असल्याने मलप्रभा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळेच मुनवळ्ळीनजीक असलेले नाविलुतीर्थ धरण भरले आहे. सध्या मलप्रभा नदीत ७ हजार क्युसेकहून अधिक पाण्याची आवक सुरू आहे. २०७९.५० फूट क्षमता असलेल्या या धरणात सध्या २०७७.३० फूट पाणीसाठा जमा झाला आहे.

पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विनाकारण नदीजवळ न जाण्याचे आणि पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या भागांमध्ये विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाविलुतीर्थ धरण भरल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. भविष्यात शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल आणि शेतीच्या कामांना चालना मिळेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Tags: