Chikkodi

चिक्कोडी-सदलगा मतदारसंघाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

Share

चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील रस्त्यांसह इतर विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली.

चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील यकसंबा-चिक्कोडी रस्त्यापासून देसाई, पटेल, माने यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि ओढ्यावर पूल बांधण्यासाठी २.३० कोटी रुपये मंजूर झाले असून, या कामांचे भूमीपूजन आमदार हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले. येथील रहिवाशांनी अनेक दिवसांपासून पूल आणि रस्त्याच्या निर्मितीची मागणी केली होती. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस वाहतूक करणे सोपे होईल आणि तांग्याकोडीशी संपर्क साधणेही सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, हिरेकोडी गावात अल्पसंख्याक समाजाच्या मोरारजी देसाई निवासी महाविद्यालयाच्या इमारतीसाठी राज्य सरकारने २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यासोबतच आमदार हुक्केरी यांनी हिरेकोडी गावातील लक्ष्मीकोडी येथे आमदार निधीतून १० लाख रुपये खर्चून बांधलेल्या हनुमान मंदिराच्या सामुदायिक सभागृहाचे उद्घाटनही केले.

Tags: