खानापूर-हेम्मडगा रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून, या रस्त्यावरील शिरोळी गावाजवळच्या वन विभागाच्या विश्रामगृहाजवळ तसेच इतरही अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर प्रवास करणे आता दिवसेंदिवस धोकादायक बनले आहे. अलिकडेच, थियोली गावाजवळ दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा खड्ड्यांमुळे अपघात झाला होता. यात ती गंभीर जखमी झाली आणि अनेक दिवसांच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेम्मडगा परिसरातील नागरिकांच्या वतीने समाजसेवक नारायण काटगाळकर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना रस्त्याच्या दुरवस्थेचे फोटो सादर करत निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी खानापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना हे निवेदन त्यांना देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
“या रस्त्याला अजून किती बळी हवे आहेत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याची पाहणी करून किमान तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अल्ताफ एम बसरीकट्टी
इनन्यूज खानापूर
Recent Comments