Belagavi

काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांची दुर्दशा : ए. एस. पाटील नडहळ्ळींचा आरोप

Share

राज्यात काँग्रेस सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची दुर्दशा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे खत आणि बियाणे वाटप करण्याचे किमान भानही राज्य सरकारला नाही, असा आरोप भाजप शेतकरी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ए. एस. पाटील नडहळ्ळी यांनी केला.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या समस्या मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. उत्तर कर्नाटकच्या समस्यांकडे बेंगळुरूपर्यंत लक्ष वेधणे गरजेचे आहे. “मुख्यमंत्री माझ्या घरी आहेत,” असे जिल्हा प्रभारी मंत्री सांगतात. ‘वन-टू-वन’ बैठक घेतात. पण, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याचे किमान भानही सरकारला नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदानित खते देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्य सरकारचे कृषीमंत्री बंगळूरू आणि मंड्या वगळता इतर कोणत्याही जिल्ह्याला भेट देऊन प्रगती आढावा बैठक घेत नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या दोन वर्षांत शेतकऱ्यांशी संबंधित कोणतीही विशेष बैठक घेतली नाही, अशी टीका त्यांनी केली.

पुढे बोलताना नडहळ्ळी म्हणाले, “उत्तर कर्नाटकातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अन्नधान्याचे उत्पादन होते. मक्यासाठी लागणाऱ्या युरियाची कमतरता येथे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर बनावट बियाण्यांचे वाटप होत आहे. आंदोलन करूनही सरकारने एक रुपयाचीही मदत दिली नाही. मक्याच्या बियाण्यांची गुणवत्ता निकृष्ट आहे. बियाणे उत्पादन करणाऱ्या एजन्सींची तपासणी किंवा बियाण्यांची पडताळणी सरकार करत नाहीये,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी भाजप शहराध्यक्ष गीता सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कौजलगी, एम. बी. झिरली, मुरुगेंद्रगौडा पाटील आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: