Uncategorized

धारवाडला हिडकल पाणी योजना पुन्हा सुरू

Share

बेळगाव जिल्ह्यातील हिडकल धरणातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु झाले असून, ‘आमचं पाणी आमचा हक्क’ आंदोलनाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री शशिकांत नायक यांनी लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काम त्वरित थांबवले नाही, तर कायदेशीर लढा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आज बेळगाव येथे बोलताना ते म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील हिडकल धरणातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम १५ दिवसांपूर्वी धरणाच्या खालच्या बाजूला सुरु करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या लक्षात येताच, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी ते थांबवून धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाने नेत्यांशी चर्चा करून काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काल रात्री पुन्हा काम सुरु झाल्याचे उघड झाले आहे. याविरोधात शेतकरी पुन्हा ‘आमचं पाणी आमचा हक्क’ आंदोलन सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.

या भागातील लोकप्रतिनिधींनी हे काम त्वरित थांबवावे. हिडकल आणि राकसकोप्पा धरणातील पुनर्वापर केलेले पाणी सुमारे अर्धा टीएमसी असते, ते धारवाडने घ्यावे. जिल्ह्यातील १८ लोकप्रतिनिधींनी या संदर्भात काम केले पाहिजे. धारवाड औद्योगिक क्षेत्राला आमचा विरोध नाही. परंतु त्यासाठी इतर पर्यायी स्रोतांचा वापर करावा. पैसे मिळतील, पण पाणी मिळणार नाही. संबंधित लोकप्रतिनिधींनी सावध राहावे. लोकप्रतिनिधींनी काम थांबवण्याचे दिलेले आश्वासन खोटे ठरले आहे. जिल्हाधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांनी त्वरित काम थांबवले नाही, तर कायद्याच्या चौकटीत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Tags: