राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर, आज बेळगावात भाजप राज्य शेतकरी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ए. एस. पाटील नडहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात बैलगाडी-चाबूक आंदोलन करत तीव्र निदर्शने करण्यात आली.

बेळगाव शहरातील रानी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला, ज्यात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर, भाजप राज्य शेतकरी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ए. एस. पाटील नडहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपचे प्रवक्ते एम. बी. जिरली म्हणाले, “कर्नाटकात कोणतीही कमतरता भासल्यास, थेट मोदींना दोष देण्याची प्रथा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुरू केली आहे. कर्नाटकात गटारगंगेचे पाणी साचले किंवा नद्यांना पूर आला तरी त्याला मोदीच जबाबदार आहेत, अशा प्रकारे मुख्यमंत्री वागत आहेत, जणू आमचा काही संबंधच नाही. गेल्या सहा महिन्यांपासून खुर्चीसाठी सुरू असलेल्या या गोंधळामुळे जनता राज्य सरकारला धिक्कारत आहे. केंद्र सरकारने दिलेला निधी थांबवण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि बोम्मई सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या सुविधा काढून टाकण्याचे ‘श्रेय’ राज्य काँग्रेस सरकारला जाते,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
माजी आमदार संजय पाटील म्हणाले, “गेल्या दोन वर्षांत राज्य काँग्रेस सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले आहेत. याशिवाय, राज्य सरकार शेतकऱ्यांवर अनेक अन्याय करत आहे. कृषीमंत्री चेलुरायस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही राज्याचा दौरा करण्याचा प्रयत्न केला नाही, हे काँग्रेस सरकारच्या दुर्लक्ष्याचे द्योतक आहे. केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या सर्व योजना आणि निधी काँग्रेस सरकारने थांबवला आहे. ‘अहिंदा’ नेते म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आधी आरशात स्वतःला पाहून आत्मपरीक्षण करावे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे काँग्रेस सरकार सत्तेत राहण्यास योग्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
यावेळी भाजपचे नगरसेवक, माजी आमदार, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Comments