Khanapur

खानापूरमध्ये ‘प्रेस डे’ विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share

खानापूर येथील शिवस्मारक सभागृहात कर्नाटक कार्यरत पत्रकार संघ, खानापूर यांच्यावतीने प्रेस डे आणि पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, सर्व भाषेतील पत्रकारांना एकत्र आणून, सर्वांशी समन्वय साधून काम करणे हे आनंददायी आहे,. खानापूर तालुका घनदाट जंगलांनी वेढलेला असून, निसर्गाने समृद्ध आहे. वनक्षेत्रात वन्यजीव-मानव संघर्ष अशा परिस्थितीत पत्रकारांना धैर्याने बातमीदारी करावी लागते. या भागात पत्रकार संघाने सर्व भाषेतील पत्रकारांना एकत्र आणून, सर्वांशी समन्वय साधून काम करणे ही आनंदाची बाब आहे, असेही जिल्हाधिकारी रोशन यांनी नमूद केले.

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी, पत्रकार त्यांच्या धारदार लेखनाने अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सतर्क करून समाजातील वाईट गोष्टी सुधारण्याचे काम करत आहेत, अशा शब्दात कौतुक केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकारांना सहकार्य करून त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांनी तालुका केंद्रात पत्रकार भवन उभारण्याची विनंतीही केली.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरंदवाडे, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार तथा बी.डी.सी.सी. बँकेचे संचालक अरविंद पाटील, दिगंबर पाटील यांच्यासह इतरांनी आपली मते व्यक्त केली. पत्रकार संघाचे अध्यक्ष कासीम हट्टीहोळी, उपाध्यक्ष वासुदेव चौगले, सचिव प्रसन्न कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी रुद्रेश संपगावी, भरत पाटील, पिराजी कुराडे, रूपा कुलकर्णी, शंकर देसूरकर, सुनील चिगुळ्ळकर यांच्यासह इतर पत्रकार, विविध विभागांचे अधिकारी, राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

Tags: