बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गंदिगवाड गावाला जोडणारे प्रमुख रस्ते पूर्णपणे खराब झाले असून, त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात पाण्याची डबकी साचून रस्ते अक्षरशः गटारात बदलले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुचाकीस्वार पडून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांची वानवा असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
खानापूर तालुक्यातील गंदिगवाड गावाला गुंडेनट्टी, बेडरट्टी आणि हिरे अंगरोळी येथून जोडणारे प्रमुख रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात पाणी साचून रस्त्यांची अवस्था गटारासारखी झाली आहे. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दिवसाढवळ्याही दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. हात-पाय मोडून रुग्णालयात दाखल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
याबाबत कर्नाटक राज्य गडिनाडू हितरक्षण वेदिकेचे सरचिटणीस एम.एम. राजीबाई यांनी बोलताना सांगितले की, “संबंधित विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी उपाययोजना कराव्यात.” तसेच, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या रस्त्याच्या विकासासाठी विशेष पॅकेज मंजूर करावे, अशी विनंती त्यांनी केली.
खानापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या गंदिगवाडमध्ये २१ ग्रामपंचायत सदस्य असूनही लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांची कमतरता स्पष्टपणे दिसून येते. याचबरोबर गडिनाडू हितरक्षण वेदिकेचे बसवरान बंगि, मल्लप्पा गाळि, गौस बागवान आणि शंकर कुरेर यांनीही तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
Recent Comments