बेळगावमधील बसवन कुडची येथे ट्रान्सफॉर्मरजवळ विजेचा धक्का लागून एका म्हशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

बसवन कुडची येथील शास्त्री गल्लीतील रहिवासी जिन्नप्पा वंडरोटी यांच्या मालकीची ही म्हैस होती. जिन्नप्पा नेहमीप्रमाणे आपल्या सहा म्हशींना चारा चरण्यासाठी देवराज अर्स कॉलनीकडे घेऊन जात असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला. या म्हशीच्या मृत्यूनंतर जिन्नप्पा वंडरोटी यांना सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हेस्कॉमने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी जिन्नप्पा यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या गेटजवळच हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थीही जीव मुठीत धरून शाळेत येत-जात आहेत. नगरसेवक आणि एस.डी.एम.सी.च्यानिदर्शनास ही बाब आणूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच, बसन कुडचीचेच एक अधिकारी हेस्कॉम कार्यालयात असूनही त्यांनी गावातील समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. गावात पावसामुळे ७-८ वीजेचे खांब कोसळले असतानाही ते अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. हेस्कॉमच्या या निष्काळजीपणाविरोधात कुडची गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.
Recent Comments