आपल्या गावात कोणतीही विकासकामे होत नाहीत आणि ग्रामपंचायत सदस्य ‘बोगस बिले’ काढून निधीचा अपव्यय करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार आंदोलन केले.

विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील हुविन हिप्परगी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे लावून ग्रामस्थांनी मोठे आंदोलन केले. हुविन हिप्परगी ग्रामपंचायत हद्दीतील अगासाबाळ गावात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत, असा आरोप अगासाबाळ आणि हुविन हिप्परगी येथील ग्रामस्थांनी केला. त्यांनी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, विकास अधिकारी आणि अगासाबाळ गावातील तीन ग्रामपंचायत सदस्यांवर ‘बोगस बिले’ काढून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला.
महिलांसाठी योग्य शौचालयांची व्यवस्था नाही, गावात सीसी रस्ते नाहीत, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गावातील पथदिव्यांना बल्ब लावलेले नाहीत आणि रस्त्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे वाहनांना जाणेही शक्य होत नाही, अशा अनेक मूलभूत समस्यांवर ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी उमेश नाडवीनमणी, शिवराज एत्तीनमणी, ईरन्ना बॅकोड, महादेव सन्नातांगी, अब्बासअली मुजावर, मंजू बणगार, कुमार अंगडीगेरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
Recent Comments