दुष्काळग्रस्त विजापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठी हानी झाली आहे. घरात साठवलेले धान्य आणि इतर वस्तू पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून गायब झालेल्या पावसाने कालपासून पुन्हा तुफान बॅटिंग सुरु केली असून विजापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजापूर शहरात हलका पाऊस झाला असला तरी, मुद्देबिहाळ, तालिकोटी आणि बसवन बागेवाडी येथे झालेल्या जोरदार पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आणि मोठे नुकसान झाले. बसवन बागेवाडी शहरातील लक्ष्मी नगर आणि रायण्णा चौकाजवळच्या २० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे घरात साठवलेले धान्य वाहून गेले आहे. घरात पाणी शिरल्याने घरातील सामानही पाण्याखाली गेले असून, महिलावर्ग हताश झाला आहे. दुसरीकडे, तलावाशेजारील घरांमध्ये पाणी शिरल्याने एका वृद्धेला मोठा त्रास सहन करावा लागला. एका तरुणाने या वृद्धेला उचलून सुरक्षित ठिकाणी नेल्याचे हृदयस्पर्शी दृश्य मोबाईलमध्ये कैद झाले आहे.

बसवन बागेवाडी विधानसभा मतदारसंघ हा मंत्री शिवानंद पाटील यांचा मतदारसंघ आहे. सलग दोन तास पडलेल्या पावसामुळे शहरातील लक्ष्मी नगरातील २० ते ३० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. धान्य पाण्यात तरंगतानाची दृश्येही समोर आली आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीने हताश झालेल्या महिलांनी, “प्रत्येक वर्षी पाऊस आला की असेच घडते, आमचे दुःख कोण ऐकणार?” असा प्रश्न विचारत संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. सध्या महसूल विभागाचे अधिकारी, महसूल निरीक्षक, ग्राम प्रशासन अधिकारी, ग्राम सहायक आणि नगरपालिका अधिकारी परिस्थितीची पाहणी करत आहेत. एकंदरीत, या पावसाळ्यातील पहिल्याच पावसामुळे अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, भविष्यात येणाऱ्या जोरदार पावसाळ्यापूर्वीच संबंधित प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Recent Comments